+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर

*खंडोबा महाराज तळी उदघोष* *तळी कशासाठी, केव्हा आणि कशी भरावी याची शास्त्रशुद्ध माहिती* ॥ जय मल्हार ॥ बोल खंडेराव महाराज की जय॥ सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार॥ हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥ भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥ सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥ निळा घोडा॥ पायी तोडा॥ कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥ गळयात कंठी॥ मोहन माळा॥ ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥ सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥ देवा ओवाळी ॥ नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥ कोठ़ लागो शिखर॥ खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥ *देव चालले जेजुरा ! हो ऽऽ !* *बोल सदानंदाचा येळकोट ॥* *येळकोट येळकोट जय मल्हार॥* *ही पहली उद्घोषणा!* आणि तळीचा नारळ किंवा खोबर्‍याची वाटी फोडल्यानंतर पुन्हा ती कलशावर ठेवून दुसरा उद्घोष करताना सर्वात शेवटी! *देव आले घरा ! हो ऽऽ !* *अशी घोषणा करतात पुन्हा त्यांना आपल्या देवघरात स्थापन करायचे असते!* येळकोट म्हणजे यल्लकोटी यल्ल म्हणजे सात ज्याचे सैन्य सात कोटी एवढे प्रचंड आहे, असा तो येळकोट खंडोबा! एवढ्या प्रचंड सैन्याचा अतिप्रचंड ताकदवान राजा म्हणून खंडोबाची स्तुती करण्यासाठी व दैवत शांत करण्यासाठी तळी हा उद्घोष पूर्ण शांती प्रस्ताव प्रथम देवतांनी केला! हि उद्घोषणा, ललकार श्री खंडोबा महाराजांची तळी भरतांना देवतांनी, ऋषींनी केली होती. जी आज महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, गुजरात इत्यादी प्रदेशात प्रादेशिक भाषांमध्ये बोलली जाते. खंडोबाच्या आरती नंतर ताम्हणात खालील वस्तू ठेवल्या जातात! वाटीभर तांदळावर खंडोबा षडरात्र स्थापनेचा कलश खंडोबाचा टाक (चांदीची प्रतिमा) खंडोबाचा तोडा, साखळी, नाल सोबत कुटुंबप्रमुखाने हातामध्ये खंडोबाची दिवटी, तेलाची बुधली धरण करावी! कुटुंबातील सर्व व्यक्ती डोक्यावर फेटे, पगडी, टोपी इत्यादी धारण करून ताम्हण हातात धरून झोक्या सारखे खाली वर करत वर दिलेला उद्-घोष करतात! या पहिल्या घोषणेच्या शेवटी *देव चालले जेजुरा हो असे म्हणतात!* वरील उद्घोषणा करताना सात वेळा झोका देऊन झाल्यावर पहिली उद्घोषणा संपते त्यानंतर कलशातील एक पान काढून जमिनीवर ठेवतात त्या पानावर देवाचा टाक किंवा प्रतिमा असलेला कलश ताम्हणा सहित ठेवतात! ज्यांचा नारळ कुजला किंवा भग्न झाला असेल त्यांनी खोबऱ्याच्या वाटीमध्ये हळद भरून त्यात देवाची प्रतिमा ठेवून मग तळी भरावी! सात वेळा झोका देऊन झाल्यावर ताम्हण जमिनीवरील पानावर ठेवतात आणि त्यातील नारळ बाहेर काढून फोडतात व फोडलेला नारळ अथवा खोबर्‍याची वाटी कलशावर ठेवून पुन्हा एकदा उद्घोषणा करत सात वेळा झोका देतात व त्यानंतर तळी पूर्ण होते! या दुसऱ्या उद्घोषणा च्या वेळी शेवटी *देव आले घरा हो !* असे म्हणतात सात वेळा झोका देण्याचा संबंध भक्तांच्या शरीरात असलेल्या सात प्रमुख चक्रांच्या शांती साठी आहे! देवाची भक्ती करताना भक्तांच्या शरीरातील सप्त चक्र जागृत होत असतात आरती आणि त्यानंतर होणाऱ्या तरी उद्घोषामुळे भक्तही पुन्हा आपल्या ऐहिक कार्यात कार्यरत होतात! देवाची प्रतिमा पुन्हा देवघरात ठेवली जाते व कलशाचे विसर्जन होते! *उद म्हणजे धूप लावून आरती सारखा फिरवत तळीमध्ये देवाला झोका देत देवाची स्तुती करताना केलेल्या घोषणांना तळी उद-घोष(उद्घोष) म्हणतात!* *हा उद-घोष आरती नंतर व्रताची सांगता करताना करतात!* *बालाजी सहित सर्व प्रमुख देवतांची रोज अशीच झोका देत उद्घोषणा करत तळी भरली जाते!* *आरतीनंतर तळी भरल्याशिवाय कोणत्याही व्रताची सांगता होत नाही!* *देवीच्या नवरात्रात देखील शेवटच्या दिवशी सांगता करताना देवीची म्हणजे आपल्या कुलस्वामिनीची तळी भरावी लागते !* *कृपया शास्त्रशुद्ध माहितीसाठी इतरांनाही शेअर करावे!* *०६,१२,२१,सोम.s.n.b.2:10 pm.plg.*

+5 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 16 शेयर

*चांगले केले तर चांगलेच होते याचे छान उदाहरण मास्तर साहेबांची स्कूटर* प्रवीण भारती नावाचे एक शिक्षक होते. ते प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा गावापासून सात किलोमीटर दूर होती. शाळेच्या आसपासची जागा ही पूर्णपणे निर्जन होती. त्यांच्या गावातून शाळेपर्यंत जाण्यासाठी क्वचितच वाहन मिळत असे, त्यामुळे ते बरेचदा कुणाकडून तरी लिफ्ट मागत असत. कधी जर लिफ्ट मिळाली नाही, तर असा विचार करत पायीच जात असत की, "देवाने मला दोन पाय दिले आहेत, तर त्यांचा उपयोग कधी होणार." जेव्हा प्रवीणजी रोज लिफ्ट मागण्यासाठी उभे राहत तेव्हा विचार करत की, “सरकारने कुठल्या निर्जन ठिकाणी शाळा उघडली आहे, त्यापेक्षा गावातच मी किराणा मालाचे दुकान उघडलं असतं तर बरं झाल असतं.” रोजच्या कटकटीतून सुटका मिळण्यासाठी प्रवीणजीनी थोडे थोडे पैसे जमा करून, चेतक कंपनीची एक नवीन कोरीकरकरीत स्कूटर विकत घेतली. स्वतःचे वाहन नसल्यामुळे जो त्रास प्रवीणजींनी सहन केला होता, त्यामुळे त्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधली की कोणालाही लिफ्टसाठी नाही म्हणायचं नाही. कारण, त्यांना हे माहित होतं की कोणी आपल्याला लिफ्ट नाकारली की किती ओशाळल्यासारखं होतं ते. आता प्रवीणजी रोज स्वतःच्या कोऱ्या करकरीत स्कूटरवरून शाळेत जात असत आणि रस्त्यात कोणी ना कोणी रोज त्यांच्याकडे लिफ्ट मागत असे आणि त्यांच्याबरोबर जात असे. परत येतानासुद्धा कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर असे. एक दिवस, जेव्हा प्रवीणजी शाळेतून परत येत होते तेव्हा रस्त्यात, एक व्यक्ती हताश होऊन लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत होती. आपल्या सवयीनुसार प्रवीणजींनी आपली स्कूटर थांबवली आणि ती व्यक्ती काहीही न बोलता त्यांच्या स्कूटरवर मागे बसली. थोड पुढे गेल्यावर त्या व्यक्तीने चाकू काढला आणि प्रवीणजींच्या पाठीवर टेकवून म्हणाला, "असतील तितके सगळे पैसे आणि ही स्कूटर माझ्या हवाली कर." ही धमकी ऐकून प्रवीणजी खूप घाबरले आणि त्यांनी लगेच स्कूटर थांबवली. त्यांच्याजवळ जास्त पैसे नव्हतेच पण ही स्कूटर तर होतीच, जिच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. स्कूटरची किल्ली त्याला देत प्रवीणजी म्हणाले, "एक विनंती आहे." "काय ?" त्या व्यक्तीने खेकसून म्हंटले. प्रवीणजी विनंतीच्या सुरात त्याला म्हणाले, “तू कधीही कोणाला हे सांगू नकोस की ही स्कूटर तू कुठून आणि कशी चोरलीस, विश्वास ठेव मी पण पोलिसात तक्रार करणार नाही.” त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले, "का?" मनामध्ये असलेली भीती आणि चेहऱ्यावर असलेल्या औदासीन्याने प्रवीणजी म्हणाले, “हा रस्ता खूप उबड-खाबड आणि निर्जन आहे. इथे क्वचितच वाहन मिळते. त्यात या रस्त्यावर जर अशा घटना घडल्या तर जे थोडेथोडके लोक लिफ्ट देतात, तेसुद्धा लिफ्ट देणे बंद करतील.” प्रवीणजींची ही भावपूर्ण गोष्ट ऐकून ती व्यक्ती हळवी झाली. त्याला प्रवीणजी एक चांगली व्यक्ती वाटली, पण त्यालाही तर स्वत:चे पोट भरायचे होते. "ठीक आहे" असं म्हणून तो स्कूटर घेऊन तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणजी, जेव्हा वर्तमानपत्र घेण्यासाठी दरवाजाजवळ आले व त्यांनी दरवाजा उघडला, तर त्यांना त्यांची स्कूटर समोर उभी असलेली दिसली. प्रवीणजींचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते पळत पळत स्कूटर जवळ गेले आणि आपल्या स्कूटरवर प्रेमाने हात फिरवू लागले, जणूकाही ते त्यांचे मूल होते. त्यांना तिथे एक कागद चिकटवलेला दिसला. त्यावर लिहिले होते : “मास्टर साहेब, असं समजू नका की तुमच्या बोलण्याने माझं हृदय द्रवले. काल मी तुमची स्कूटर चोरी करुन गावी गेलो, वाटलं भंगारवाल्याला ती विकून टाकावी, पण ज्याक्षणी भंगारवाल्याने ती स्कूटर पाहिली, मी काही बोलायच्या आधीच तो उद्गारला, "अरे ही तर मास्तर साहेबांची स्कूटर आहे." स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात मी त्याला म्हणालो : "हो! मास्तर साहेबांनी मला बाजारात काही कामानिमित्त पाठवल आहे." कदाचित त्याला माझा संशय आला होता. तिथून सूटून मी एका बेकरीत गेलो. मला खूप भूक लागली होती व काहीतरी खाण्याचा मी विचार केला. बेकरीवाल्याची नजर स्कूटरवर पडताच तो म्हणाला, "अरे ही तर मास्तर साहेबांची स्कूटर आहे." हे ऐकून मी घाबरून गेलो आणि गडबडून म्हणालो, "होय, या गोष्टी मी त्यांच्यासाठीच घेतोय, कारण त्यांच्या घरी काही पाहुणे आले आहेत.” कसंतरी करून मी तेथूनही निसटलो. मग मी विचार केला की गावाबाहेर जाऊन कुठेतरी तिला विकून येतो. मी थोड्याच दूरपर्यंत गेलो होतो की नाक्यावरील पोलिसाने मला पकडलं आणि रागाने विचारले की, "कुठे चालला आहेस? आणि ही मास्तर साहेबांची स्कूटर तुझ्याकडे कशी आली?” मग काहीतरी बहाणा करून, मी तिथून ही पळालो. पळून पळून मी आता दमलो आहे! *मास्तर साहेब ही तुमची स्कूटर आहे की अमिताभ बच्चन??* सगळेच तिला ओळखतात. तुमची अमानत मी तुमच्या स्वाधीन करत आहे. तिला विकण्याची ना माझ्यात हिंमत आहे ना ताकद. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्रास दिल्याच्या बदल्यात, मी तुमच्या स्कूटरची टाकी पूर्ण भरून दिली आहे.” हे पत्र वाचून प्रवीणजींना हसू आले आणि ते म्हणाले, *"कर भला तो हो भला."* ♾ *जर तुम्ही उदात्त अंतःकरणाचे असाल, तर तुमच्या आसपासच्या लोकांना नक्कीच आनंद जाणवेल.* म्हणून जीवनात कधीही कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहु नका......🙏 *०६,१२,२१,सोम.s.n.b.1:52 pm.plg.*

+2 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 10 शेयर

*६ डिसेंबर १९५६.भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन.* *६ डिसेंबर १९९२.अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.* शुभ दिन👏👏🌷🌷👏👏 आजचा दिनविशेष.६ डिसेंबर १९१५.संगीत रंगभूमीची ध्वजा फडकावत ठेवणाऱ्या मराठी रंगभूमी संस्थेचे ‘शिलेदार’.. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे अभिनेते जयराम शिलेदार यांचा जन्मदिन. चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या मोजक्‍या कलावंतांमध्ये त्यांचा समावेश होतो. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत नाट्यकलेचा श्रीगणेशा केलेल्या शिलेदार यांना गंधर्व नाटक मंडळीमध्ये बालगंधर्वांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याकाळी संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या. संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली होती. जयराम शिलेदार यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवण्यासाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले. परिणामी त्यांनी रंगभूमीवर आणलेल्या संगीत नाटकांच्यामुळेच, संगीत रसिकांची पावले पुन्हा नाट्यगृहाकडे वळली. नव्या पिढीलाही त्यांनी संगीत नाटकांचे वेढ लावले. ते वाढवले आणि युवा पिढीनेही संगीत नाटकाची ही परंपरा पुढे चालवायसाठी प्रयत्‍नही केले.केवळ संगीत नाटक हेच जीवितकार्य समजून त्यांनी दि. १ ऑक्टोबर १९४९ रोजी ‘मराठी रंगभूमी’ ही संस्था उभारली. ' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. ४५ वेगवेगळ्या संगीत नाटकांचे सहा हजारावर प्रयोग केले. व्ही. शांताराम यांच्या 'लोकशाही रामजोशी' या चित्रपटातील भूमिकेने त्यांना अजरामर केले.याच भूमिकेमुळे ते रसिकांच्या मनात कायम राहिले आहेत. ‘ 'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही लावणी म्हणणारा त्यांचा रंगेल शाहीर रसिकांच्या मनात घर करून आहे. गडक-यांच्या ‘पुण्यप्रभाव’मधील त्यांची भुपालीची भूमिकाही अविस्मरणीय होती. सं. ‘स्वयंवर’मधील कृष्णा, ‘मानपमाना’तील धैर्यधर, ‘सौभद्रा’तील अर्जुन, ‘द्रौपदीतील’ दुर्योधन किती भूमिका सांगाव्यात! ‘जीवाचा सखा’, ‘माझा राम’, ‘पंढरीचा पाटील’, ‘संत नामदेव’ या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. गंधर्वभूषण जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान!! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. ‘संगीत सौभद्र’, ‘मानपमान’ या नाटकांचे प्रयोग करत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेशात दौरे केले. मराठी संगीत रंगभूमी गाजवत ठेवली ती अखेपर्यंत! आज या क्षेत्रात ‘शिलेदार घराण्याचे’ स्वतंत्र दालन आहे. देखणे रूप, खडा मर्दानी आवाज आणि उत्तम अभिनय या बळावर त्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले. त्यांनी अनेक जुनीनवी संगीत नाटके रंगभूमीवर आणली. अ.ना. भालेराव यांच्या पुढाकाराने सांगली, मुंबई आणि महाराष्ट्रात अन्यत्रही नाट्यमहोत्सव १९४३ मध्ये झाले. मराठी रंगभूमीवर पुन्हा नवचैतन्य आले. जुन्या नटांना रंगभूमीवर वाव मिळाला. नवे संगीत दिग्दर्शक नट-नट्या पुढे आल्या. ‘सूरसंगत’ हे  जयराम शिलेदार यांचे आत्मचरित्र आहे. सुरेल गायकीमुळे ‘गंधर्वभूषण’ या किताबाचे मानकरी ठरलेल्या ,संगीत नाटय़कलेची आजन्म सेवा करणाऱ्या जयराम शिलेदारांना शतशः प्रणाम!!!! माहिती संकलन सौ.संध्या यादवाडकर माहिती स्त्रोत -- इंटरनेट. 9819993137.

+4 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर

🎄🔴🎄 **२) ज्ञानदेवांचा नाथसंप्रदाय** ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी आपली गुरुपरंपरा सांगितली आहे. फार पूर्वी त्रिपुरारी शंकरानी पार्वतीच्या कानात उपदेश केला. तो मत्स्याच्या पोटात असलेल्या विष्णूने म्हणजे मत्स्येंद्रनाथांनी ऐकला व ते ज्ञानसंपन्न झाले. मत्स्येंद्रनाथ संचार करत सप्तशृंगी गडावर आले. तेथे हातपाय तुटलेले चौरंगीनाथ त्यांना भेटले. मत्स्येंद्रनाथांनी चौरंगीनाथांना उपदेश केला. मत्स्येंद्रनाथांनी योगरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करण्यात शूर, असे जे गोरक्षनाथ, त्यांनाही समाधिपदाचे ठिकाणी अभिषेक केला. मग गोरक्ष नाथांनी ते शंकरांपासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य, सामर्थ्यासह श्रीगहिनीनाथास दिले. कली हा प्राण्यांना खरोखर ग्रासित आला आहे असे पाहून गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना आज्ञा दिली ती अशी की आद्य गुरु जो शंकर त्यापासून शिष्यपरंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला तो हा सर्व घेऊन तू कलीकडून गिळाल्या जाणार्‍या जीवांना सर्व प्रकारे संकटात सत्वर मदत कर. मेघांना वर्षाकाळाची जोड मिळाली म्हणजे ते जशी जोराची वृष्टि करतात, त्याप्रमाणे स्वभावत: कृपाळू असलेल्या श्रीनिवृत्तिनाथांना गहिनीनाथांचा उपदेश मिळाला व त्यावर गुरुआज्ञेचा निरोप मिळाला. मग पीडित प्राण्यांच्या (दयेने, गीतेचा अर्थ) जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तिनाथांकडून ही जी शांतरसाची वृष्टि झाली तोच हा माझा गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. असे ज्ञानदेव म्हणतात. यावरून ज्ञानदेवांची गुरुपरंपरा अशी दिसून येते - आदिनाथ शंकर - मत्स्येंद्रनाथ - गोरक्षनाथ - गहिनीनाथ - निवृत्तिनाथ - ज्ञानदेव. ज्ञानदेवांच्या आधीही ज्ञानदेवांचे पणजे त्र्यंबकपंत यांना गोरक्षनाथांनी अनुग्रह दिला होता. तसेच आजे गोविंदपंत व आजी नीराबाई यांना गहिनीनाथांचा अनुग्रह झालेला होता. ज्ञानदेवांच्या पित्याला श्रीपादस्वामींचा (किंवा रामानंद यांचा) अनुग्रह झालेला होता. मग पित्याची गुरुपरंपरा सोडून ह्या चार भावंडांनी नाथपंथात का प्रवेश केला असावा ? असा प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे म्हणतात की मातापित्यांनी जलसमाधी घेतल्यामुळे पित्याकडून परंपराप्राप्त अनुग्रह मिळण्य़ाचा त्यांचा मार्ग बंद झाला. संन्याशाची मुले म्हणून समाजाने या भवंडांना वाळीत टाकले होते. आता आपली मुंजच झाली नाही तर आपल्याला द्विज कोण म्हणणार ? ब्राह्मणत्वापासून पतित होण्याची परिस्थिती निर्माण झाली. समाजात तर चातुर्वर्ण्य व्यवस्था दृढमूल झालेली होती. आता ज्ञान, भक्ति, वैराग्य ही मोक्षप्राप्तीची सर्व साधने जवळ असून सुद्धा दीक्षामंत्राच्या आधाराशिवाय त्या साधनांचा काहीही उपयोग होण्यासारखा नव्हता. नाथपंथामधे चातुर्वर्ण्याची आडकाठी नव्हती. शिवाय ज्ञानदेवांच्या आजोबांना व पणजोबांना नाथपंथाची दीक्षा मिळालेली होती. म्हणून ह्या चारही भावंडांनी नाथपंथ स्वीकारला. भाव्यांचे असे मत जरी असले तरी ज्ञानदेवांच्या वंशात नाथसंप्रदायाची दीक्षा परंपरेने झालेली दिसते. तांत्रिक साधना हे मध्ययुगीन काळाचे वैशिष्ट्य होते. पंचमकार साधना हे तंत्रमार्गाचे वैशिष्ट्य होते. स्त्री हे अशा प्रकारच्या साधनेत अत्यावश्यक साधन मानले जात असे. शैव, शाक्त, कापालिक, सहजयान, वज्रयान, कौल वगैरे पंथांमधे वामाचार फैलावला होता. तंत्रातील सर्व घृणास्पद आचार अवलंबले जात होते. साधनेला अवकळा प्राप्त झाली होती. तत्कालीन साधनामार्गाला प्राप्त झालेले विकृत व भोगासक्त रूप नाहीसे करण्यासाठी नाथपंथातील संतांनी प्रथम विशुद्ध व निष्कलंक चारित्र्याचा आदर्श निर्माण केला. लोककल्याणाच्या तळमळीतून भारतभ्रमण केले व विषयासक्ती, अनाचार, दांभिकता, परमार्थाच्या नावाखाली चालणारा दुराचार अशा साधनामार्गाला लागलेल्या कलंकित गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला व योगसाधनेचे राज्य प्रस्थापित केले. तसेच विविध संप्रदायातील उदात्त तत्वांचा आपल्या संप्रदायात समावेश केला. शुद्ध योगमार्गाला उचलून धरले. हठयोगाचे प्रतिपादन करून संयम, इंद्रियनिग्रह व ब्रह्मचर्य यांची अनिवार्यता पटवून दिली. वर्णाश्रमधर्म, रूढी, कर्मठपणा, तीर्थयात्रा इत्यादी धर्माच्या नावाखाली फोफावलेल्या आचारांना विरोध केला. त्यामुळे नाथसंप्रदाय हा केवळ वाणीचा विषय राहिला नाही. प्रत्यक्ष आचाराला यात प्राधान्य दिले गेले. अद्वयानंद अनुभवण्याचा मार्ग म्हणून पारमार्थिक लोक त्याकडे आकृष्ट झाले. त्यांच्या लोकोत्तर कार्यातूनच पुढे भारतीय साधनेत भक्तिप्रधान परंपरा निर्माण झाल्या. अशा परिस्थितीत समाजाला भक्तिसूत्रात गुंफून ठेवण्याचे महत्वाचे कार्य गोरक्षनाथांनी केले. लोकभाषेतून समाजाला उपदेश, लोकभाषेतून ग्रंथलेखन, शिवाबरोबर दत्तात्रेयांना देवतासमूहात स्थान, योगमार्गाला दिलेली भक्तिप्रेमाची जोड ही गोरक्षनाथांच्या कार्याची विशेषता आहे. पुढे गहिनीनाथांनी नाथसंप्रदायाला कृष्णभक्तीची जोड दिली. या संप्रदायाच्या मते शक्तियुक्त शिव हेच अंतिम सत्य आहे. शक्ति ही शिवाहून भिन्न नसून ती शिवस्वरूपी स्थित आहे. ती अखंड क्रियाशील असून ती कधी सूक्ष्म तर कधी स्थूल, कधी व्यक्त तर कधी अव्यक्त असते. तिच्या संकोच-विकासातून हे विश्वचक्र संचलित होत असते. शिवातील ‘इकार’ म्हणजे शक्ति असून तिच्या शिवाय ‘शिव’ हा केवळ ‘शव’ आहे. **शिवोऽपि शक्तिरहित: कर्तुं शक्तो न किञ्चन ।** **स्वशक्त्या सहित: सोऽपि सर्वस्याभासको भवेत् ॥** स्वशक्तीने युक्तच शिव सर्व निर्माण करतो असा त्यांचा सिद्धांत आहे. गोरक्षनाथ सांगतात की **शिवस्याभ्यन्तरे शक्ति: शक्तेरभ्यन्तरे शिव: ।** **अन्तरं नैव जानीयात् चन्द्रचन्द्रिकयोरिव ॥** चंद्रापासून चांदणे जसे भिन्न नाही त्याप्रमाणे शिवाहून शक्ति भिन्न नाही. जेव्हा ती विश्वरूपाने व्यक्त होते तेव्हा खर्‍या अर्थाने शिवच विश्वाचा निर्माता ठरतो. जेव्हा ती अव्यक्त असते तेव्हा शिवच स्वयंप्रकाश अद्वयरूप असतो. शिव-शक्ति नामभेदाने एक शिवस्वरूपच नांदत असते. ब्रह्मांडाला व्यापून राहिलेली शक्ति मानवदेहात कुंडलिनीरूपाने स्थित आहे असा नाथसंप्रदायाचा विश्वास आहे. त्यामुळे नाथपंथी साधकाचे कुंडलिनी जागृत करून शिवशक्तीच्या समरसतेची सहजसमाधी अनुभवणे हेच उद्दिष्ट असते. **‘ब्रह्माण्डवर्ति यत्किञ्चित् तत्पिण्डेऽप्यस्ति सर्वथा’** जे काही ब्रह्मांडात आहे ते सर्व पिंडात आहे असे सिद्धसिद्धांतसंग्रह मधे म्हटले आहे. तेव्हा सगुण-निर्गुणापलीकडील द्वैताद्वैतविलक्षण अशा परमपदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधकाला पिंडज्ञानाची आवश्यकता आहे. पिंड ही ब्रह्मांडाची छोटी आवृत्तीच आहे. म्हणून नाथयोगी पिंडातच संपूर्ण चराचराचे ज्ञान करून घेतो. विविध पिंडांनी युक्त ब्रह्मांड हे ते व्यक्त असो वा अव्यक्त असो शक्तीहून भिन्न नाही आणि शक्ति ही शिवाहून भिन्न नाही. थोडक्यात शिव हाच जगाचा आत्मा आहे. म्हणून जीव व जगत् यांच्या अंतर्यामी असणार्‍या शिवाशी ऐक्यतेचा अनुभव घेणे याला समरसीकरण म्हणतात, हे अद्वयानंदवैभव नाथपंथाचे अंतिम ध्येय आहे. हे समरसीकरण साधणे म्हणजे कुंडलिनी जागृत करून समाधिस्थितीप्रत पोचणे. ज्ञानदेवांनी सहाव्या अध्यायात यालाच **‘पिंडे पिंडाचा ग्रासु’ (६-२९१)** असे म्हटले आहे. देहाच्या सहाय्य़ानेच विदेहस्थिती अनुभवणे म्हणजे पिंडाने पिंडाचा ग्रास करणे होय. **सांप्रदायिक वेश व आचार -** कर्णकुंडल, धंधारी, रुद्राक्षमाला, किंकरी, मेखला, जानवे, शृंगी, कंथा, दंडा, खापरी व आधारी असा नाथसंप्रदायातील साधूंचा पूर्वापार बाह्य वेश चालत आलेला आहे. धंधारी हे लाकडी किंवा लोखंडी पट्ट्याचे चक्र असून त्याच्या छेदातून दोरा ओवायचा व मंत्र म्हणत काढायचा. धागा सोडवल्यास ईश्वर प्रसन्न होतो अशी या पंथाची धारणा आहे. रुद्राक्ष म्हणजे शिवाचा डोळा. पंचमुखी किंवा एकमुखी रुद्राक्षमालेत ३२, ६४, ८४ किंवा १०८ रुद्राक्ष असतात. मनगटातील स्मरणीत १८ किंवा २८ मणी असतात. किंकरी हे सारंगीसारखे वाद्य असते. जानवे हे मेंढीच्या लोकरीचे किंवा सुताचे बनवलेले असते. शृंगी बांधण्यास तिचा उपयोग होतो. शृंगी म्हणजे शिट्टी. ती हरिणाच्या शिंगाची, तांब्याची अथवा पितळेची असते. कंथा हे भगव्या रंगाचे वस्त्र असते. दीड हात लांबीच्या दंड्यास गोरक्ष दंडा अथवा भैरवदंडा म्हणतात. भिक्षेसाठी वापरावयाचा मडक्याचा किंवा नारळाच्या करवंटीचा अर्धा भाग म्हणजे खापरी. अधारी हे लाकडी दांड्यास खाली वर फळ्या ठोकून बसण्यासाठी केलेले आसन. स्त्रीशूद्रादी भेदभाव निपटून काढून परमार्थमार्ग सर्वांना खुला करण्याचे अद्वितीय कार्य नाथपंथाने केले. त्यामुळे जातिभेदाची धार काही अंशी बोथट झाली. मुसलमान, वर्णभ्रष्ट यांनाही त्यांनी आपल्या पंथात प्रवेश दिला. या नाथपंथातील थोर विचारांचा वारसा घेऊन दया, क्षमा, शांती, बंधुता या उद्दात्त कल्पनांच्या पायावर भक्तीचे महान मंदिर उभे करण्यास कबीर, ज्ञानदेवादी संतांना प्रेरणा मिळाली. देशी भाषांचा पुरस्कार हे या पंथाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. भारतभर पसरलेल्या नाथ संप्रदायाने हिंदी, मराठी, बंगाली वगैरे देशी भाषेतून वाङ्मयनिर्मिती केली. लोकभाषातून पंथप्रचार व वाङ्मयनिर्मिती करण्याची परंपरा नाथसंप्रदायानेच प्रथम निर्माण केली. तीच परंपरा उत्तरकालीन गोरक्षनाथादी संतांनी चालवली. नाथपंथाचा उगम उत्तरहिंदुस्थानात आहे. हे नाथपंथी साधु भारतभर धर्मजागृतीचे कार्य करीत असावेत असे दिसते. बंगाल, गुजराथ, कर्नाटक, वर्‍हाड, दक्षिण भारत वगैरे सर्व ठिकाणी यांचा संचार होता. या पंथाचे आदिगुरु प्रत्यक्ष आदिनाथ शंकर आहेत. म्हणून या संप्रदायाला नाथपंथ असे नाव मिळाले. सिद्धमत किंवा सिद्धमार्ग असेही या पंथाचे नाव आहे. कारण नाथ स्वत:सिद्ध असतात अशी त्यांची समजूत आहे. या मताचा **‘सिद्ध-सिद्धांत-पद्धती’** हा प्रामाणिक ग्रंथ आहे. नाथसंप्रदाय हा शैव संप्रदाय आहे व मूळ उपास्य देवता ‘आदिनाथ शंकर’ आहे. नाथसंप्रदायाने योगमार्गावर अवास्तव भर दिला होता. सर्व समाजाला हा मार्ग अवलंबणे शक्य नव्हते. त्यामुळे नाथपंथातील उदात्त तत्त्वांचा वारसा घेऊन पुढील संतमहात्म्यांनी शुद्ध भक्तितत्त्वाच्या पायावर भक्तिपंथाची उभारणी केली. ज्ञानदेव त्यामधे अग्रणी होते. सौ. मनीषा अभ्यंकर. **संदर्भ ग्रंथ -** १) सार्थ ज्ञानेश्वरी - सोनोपंत दांडेकर. २) ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र - ल. रा. पांगारकर. ३) ज्ञानेश्वर दर्शन - वाङ्मयोपासक मंडळ अहमदनगर ४) महाराष्ट्र सारस्वत - कै. वि. ल. भावे ५) महाकैवल्यतेजा - इ साहित्य प्रतिष्ठान ६) ज्ञानदेव व नामदेव - डॉ. शं. दा. पेंडसे ७) श्री ज्ञानेश्वर - तत्त्वदर्शी आणि कवी - स्वामी शिवतत्त्वानंद - रामकृष्ण मठाचे प्रकाशन ९) लघुग्रंथत्रयी - शिरीष शांताराम कवडे - वामनराज प्रकाशन १०) लघुग्रंथसप्तक - शिरीष शांताराम कवडे - वामनराज प्रकाशन. *०६,१२,२१,सोम.s.n.b.9:35 am.plg.*

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 14 शेयर

*🚩।।श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर।।🚩* 🙏🌹🙏🌹🙏🌹 *प्रवचन - ६ डिसेंबर* *निरासक्ति आणि शरणागति* एखाद्याची सुरी असली, तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली; दुसर्‍याने चांदीची केली, कुणी सोन्याची केली; पण मारल्यानंतर परिणाम एकच ! तसा, प्रपंच चांगला असला, कसाही असला, तरी तो सुरीच आहे, त्याचा घात सगळीकडे सारखाच ! प्रपंचाची आसक्ति म्हणजे सुरीची धार आहे. म्हणून, आपला धंदा, नोकरी, सगळे उत्तम करावे,त्यात मागेपुढे पाहू नये; पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी. नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ति आणि अभिमान राहणार नाही. सावधगिरीने वागावे, भगवंताचे स्मरण ठेवावे, त्याचे नाम घ्यावे; बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या. यानेच समाधान मिळेल. भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही. 'मी समाधान राखून चाललो' असे म्हणणारा, तो जगात धन्य आहे खरा ! ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे, राम कर्ता आहे, ही भावना ठेवून आपण प्रपंच करू या. प्रयत्‍न आटोकाट करावा, पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे. भगवंताची प्राप्ति व्हायला दुसरे काही नको, शरणागती पाहिजे. मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे. इतके उपाधीरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही. ते साधन तुम्ही करा. भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने भरलेले असू नये. एकमेकांवर प्रेम करा, घरातून सुरुवात करा. मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही, पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. निःस्वार्थीपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा. त्यासाठी, राम दाता आहे, पाठीराखा भगवंत आहे, ही जाणीव ठेवून तुम्ही रहा. ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे. मनाची शांति मिळवायला हाच मार्ग आहे. दैन्यवाणे कधीच नसावे. अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा, पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता, मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा. वैभव आज आहे, उद्या नाही; वैभवावर विश्वास ठेवू नका. मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही रहा. त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या, राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा. *३४१. सुख कशात आहे ? सुख हे समजुतीमध्ये आहे, आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे.*

+9 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 12 शेयर