जगावं तरी कसं?> (हा लेख मी सोशल मिडीया वरून संकलित आणि संपादित केलेला आहे) जगात वागावं कसं याची सध्या मला चिंता सतावतेय. मला सर्वांचंच म्हणणं पटतं. आणि त्यामुळेच मी अडचणीत सापडलोय. तरी लोकांचे टोमणे काही थांबले नाहीत. जगाचं असंच असतं!! आता हेच बघा ना! * मनुष्य गरीब असला की लोक म्हणतात पैसे कमवायची अक्कल नव्हती त्यामुळेच चार पैसे कमवू शकला नाही. * श्रीमंत असला की म्हणतात, दोन नंबरचा धंदा करत असणार! त्याशिवाय का कुणी आजकाल श्रीमंत होतं ? प्रामाणिकपणे वागून पैसे मिळत नाहीत. आम्ही चोवीस तास राब राब राबतोय, पण झालो का श्रीमंत ? तो श्रीमंत झाला कारण निश्चीत बेईमानी केली असणार त्याने ! त्याशिवाय तो श्रीमंत होऊच शकणार नाही. * पैशाच्या मागे दिवसरात्र धावू लागला की म्हणतात पैशाची हाव सुटली आहे. याला माणूसकी उरली नाही आहे. * पैशाला जीवनात महत्व दिलं नाही तर म्हणतात, त्याच्या जीवनात महत्वाकांक्षा नाही. संसार आणि पोराबाळांची शिक्षणं कशी करणार देव जाणे? याला स्वतःचा संसार समजत नाही का? * नुसतेच पैसे कमावले आणि खर्च न करता साठवून ठेवले तर कवडीचुंबक म्हणतात. दानशूर कर्णाची उदाहरणे दिली जातात. * जीवनात चैन केली आणि जरा पैसा खर्च केला तर लगेच त्याला उधळ्या म्हणतात. भविष्यासाठी पैसा साठवून ठेवा म्हणतात. * समजा वाडवडीलांची संपत्ती मिळाली तर त्याचेही सुख लोकांना पाहवत नाही. लगेच त्याला म्हणणार, बघा कसा बसलाय आयत्या बिळावर नागोबा! स्वत:चं काही कर्तृत्व दाखवलं का कधी आयुष्यात? * आयुष्यात कष्ट करून पैसे कमावले तरी टोमणे काही सुटत नाहीत. म्हणतात की, काय उपयोग आहे त्याच्या आयुष्याचा ? नुसता पैशाच्या मागे धावतोय पण सुख उपभोगायला वेळ नाही. असं आयुष्य काय कामाचं? * जास्त भाविक असला तर लोक म्हणतात मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव! अंगी माणूसकी पाहिजे, नुसती देवपूजा करून काय उपयोग? * मंदीरात नाही गेला, देवपूजा नाही केली तर नास्तिक म्हणतात. देवधर्माचं थोडंतरी केलं पाहिजे असे म्हणतात. * तारुण्यात अकाली मृत्यू आला तर हळहळतात, म्हणतात: अरेरे फार लवकर गेला. त्याचा भविष्यकाल उज्ज्वल होता. * दीर्घायुषी झालात तर तेच लोक म्हणतील अजून किती दिवस सरकारची पेन्शन खाणार कुणास ठाऊक? कुठल्या चक्कीचा आटा खातोय कुणास ठाऊक? * मनुष्य तब्येतीने बारीक असला तर काडी पहेलवान आणि एकपाचर्‍या म्हणतात. बारीक माणूस दिसल्यावर म्हणतात की तुझ्याकडे पाहिलं की देशात दुष्काळ पडलाय असं वाटतं. बारिक माणसांची रोग प्रतिकार शक्ती कमी असते असे टोकले जाते. याची तब्येत काही सुधरत नाही, असे म्हणतात. * मनुष्य तब्येतीने जाड असला की हत्ती म्हणतात. एवढी जाड तब्येत असली तर विविध रोग होतात असे म्हणतात. जाड मनुष्य बघितल्यावर म्हणतात हा दुष्काळ जाड माणसांमुळेच पडतो असे टोकतात. त्याचे खाणे काढतात. * परफेक्ट फीगर आणि सिक्स पॅक अॅब्ज असले तरीही काही ना काही टिका होतेच. आपल्याला थोडेच माॅडेलिंग करायचे आहे अशी टिका होते. जिम मध्ये जाऊन काय करणार, एवढी बाॅडी बनवून काय करणार, शेवटी मरायचेच आहे असे म्हणतात. * पोट सुटले असेल तरीही नावे ठेवणार! पोट प्रमाणबद्ध असेल तरी म्हणणार की अरे थोडे पोट सुटले की ती सुखी संसाराची निशाणी असते. सपाट पोट ठेऊन आपल्याला कुठे मा‍ॅडेलिंग करायचं आहे? * सहज कोणाला मदत केली तर म्हणतात यामागे काहीतरी हेतू असणार ! * नाही मदत केली तर म्हणणार, यांचेकडे साधी माणूसकी नाही! * सरळ स्वभावाचा असेल, दानशुर असेल, सत्य बोलत असेल तर म्हणतात अंगात थोडातरी स्वार्थ हवा होता. भोळा सांब आहे, असे म्हणतात. "आलाय मोठा राजा हरिश्चंद्राचा अवतार!"अशी दूषणे दिली जातात. * स्वार्थी असलाच तर म्हणतात सरळ स्वभाव हवा. दानशूर लोकांची उदाहरणे दिली जातात. म्हणतात की स्वार्थाचा पैसा काय कामाचा ? "माणसाने दानशुर कर्ण असले पाहिजे" अशी उदाहरणे दिली जातात. भले असे म्हणणारे लोक स्वतः मात्र गरिब भिकार्‍याला एक पैसासुद्धा देतात की नाही हा संशोधनाचा विषय ठरेल. * खेळकर आणि गमतीदार स्वभाव असला तर म्हणतात हा आचरट आहे. याला परिस्थितीचं गांभीर्य नाही. दोन पोरांचा बाप झाला याला शोभतं का असं? * गंभीर असणंही त्यांना रुचत नाही. म्हणतात, हसण्याची अलर्जी आहे. जीवन मस्त मजेत जगलं पाहिजे. हा फारच गंभीर असतो बुवा! * तुम्ही यशस्वी झालात तरी यांना अडचण होते. म्हणतात, आमचं ऐकल्यामुळेच यशस्वी झाला, नाहीतर झाला नसता! *अयशस्वी झालात तर म्हणणार आमचं ऐकलं नाही ना! मग भोगा आता आपल्या कर्माची फळं! *अभ्यासात हुशार नसेल तर म्हणतात की याचे पुढे कसे होईल कुणास ठाऊक? याला आई वडील त्याच्यासाठी घेत असलेल्या कष्टांची जराही पर्वा नाही. *चांगले मार्क पडले तर म्हणतात की या मार्कांचा शिक्षणाचा व्यवहारात काही उपयोग नाही. याचे कडे माणुसकी नाही. याने घोकमपट्टी केली असेल. * सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असले तर म्हणणार, नुसते देखणेपण काय कामाचे? बुद्धी तर हवी ना! सुंदर व्यक्तींना उगाचच शहानिशा न करता केवळ "सुंदर व्यक्ती आहे म्हणून निर्बुद्धच असेल" असे म्हणून हिणवले जाते. * बुद्धी असली तर म्हणणार, नुसती बुद्धी असून काय उपयोग? थोडे सौंदर्य आणि देखणे व्यक्तिमत्व असायला हवे होते? त्याशिवाय काय उपयोग? पर्सनॅलिटी असायला हवी, नुसती हुशारी असून काय उपयोग? अहो, लोकांचं काय घेऊन बसलात? काहीही केलंत तरी त्याला नावं ठेवण्याची लोकांना सवय असल्याने त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं? लोक घोड्यावरही बसू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाहीत. जग काय म्हणेल याची पर्वा करत आपलं जीवन का नासून घ्यायचं ? मंगेश पाडगावकरांनी फार सुरेख शब्दात ही भावना व्यक्त केलीय... फिदीफिदी हसतील ते हसू देत की ! बोटं मोडीत बसतील ते बसू देत की ! आपण का शरमून जायचं ? कशासाठी वरमून जायचं ? कशासाठी भयाने ग्रासून जायचं ? फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं ? आपलं जीवन आपण ठरवायचं, कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत? आपलं आपणच ठरवायचं......

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 45 शेयर

लक्ष्मी माहेरचे संस्कारांचे वैभव घेऊन घरात प्रवेश करते  वैभवलक्ष्मी आल्यागेल्याचा मानपान ठेऊन घर भरले ठेवते ऐश्वर्यलक्ष्मी ओठातून पोटात शिरायचे कसब जाणते अन्नपूर्णा होऊन धान्यलक्ष्मी वंशवाढी साठी बाळाला नऊ महिने उदरी वाढवते संतानलक्ष्मी पैसा पैसा कष्टाने साठवून त्याचा योग्य विनियोग करते धनलक्ष्मी घराबाहेर पडून संसाराला  आपल्या परीने हातभार लावते वीरलक्ष्मी वंशाच्या दिव्यासह वंशाच्या पणती ला ही सन्मानाने वाढवते आधीलक्ष्मी लेकरांना जगाचे ज्ञान देवून विजयपथावरआणते विजयालक्ष्मी सर्व आघाड्यांवर लढून आपुल्या बलाचे दर्शन घडवते गजलक्ष्मी या सर्व लक्ष्मी रूपांनी सजते आपुल्या घरी युगानुयुगे गृहलक्ष्मी मंजू काणे

+10 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 24 शेयर

#हॅपी_रिटायर्ड_लाईफ!! ३-४ वर्षांपूर्वी एका रविवारी अचानक माझा मित्र अनिल आणि त्याची पत्नी अदिती (नावे बदललेली) माझ्या घरी आला. एकदम आनंद! खूप वर्षांनंतर भेट होत होती. अनिल रिझर्व्ह बँकेत नोकरी करून काही वर्ष आधी स्वेच्छा निवृत्ती घेतलेला. बँकेत असताना सुद्धा काही शिकवण्या करून आपल्या income ला जोड दिलेली. अदितीने खूप धडपड करून एक छोटासा व्यवसाय उभा केला होता. तो तसा छान चालला. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी आर्थिक बाजू भक्कम झाली होती. एक मुलगा आणि एक मुलगी अशी पुलंच्या भाषेत 'बेतशुद्ध संतती' असलेला. दोघांची लग्न झालेली. पुन्हा पुलंच्या भाषेत 'संसाराच्या शेवटी इष्ट स्थळी जाऊन पोचलेली' अशी ही जोडी. दोघांचाही स्वभाव दिलखुलास! त्यामुळे तो घरी येणे म्हणजे एक आनंद सोहळा! मग थोड्या हवा पाण्याच्या गप्पा झाल्यावर मी त्याला विचारले, "मग कसं काय चाललंय रिटायर्ड लाईफ?" "एकदम मस्त".... अनिल "आता काय करतोस?".. मी "काहीही नाही. म्हणजे तसं ठरवलंच आहे. खूप कष्ट केले रे. आता मात्र आपण कमावलेलं आपण उपभोगायचं असं ठरवलं आहे!" "वा.. मग वेळ कसा जातो"....मी "अरे इथे वेळ जाण्याचा प्रश्न आहेच कुणाला. आयुष्यभर एक - एक मिनिट धावत होतो. आता धावायचं नाही. परमेश्वराने आमच्या दोघांचे आयुष्य आरामात जाईल एवढं सगळं दिलं आहे. तेव्हा शांतपणे राहायचं. अगदी सकाळचा walk सुद्धा ७:०० वाजता. उगीच लवकर उठा वगैरे काही नाही".... अनिल "आणि मुलगा?" .... मी "हे बघ. त्याला मी स्पष्ट सांगितलं. बाबारे, आपलं वडील - मुलाचं नातं वगैरे ठीक आहे. पण आता तुझं लग्न झालंय. तेव्हा तू आता स्वतंत्र राहा. माझं स्पष्ट मत आहे. मुलांनी वेगळं राहिल्याशिवाय त्यांना आयुष्य कळणार नाही.".... अनिल "हं"....मी थोडं hesitantly म्हटलं. "अरे बघ ना. वेगळं राहिलं म्हणजे आपण गॅस बंद न केल्यामुळे दूध उतू जाऊन भांडं जळून काळं कसं होतं, किल्ली घरात विसरल्यावर कसा कल्लोळ होतो, भाजी आणायला गेल्यावर नाईलाजाने आपल्याला न आवडणारा भोपळा किंवा दुधी कशी 'झक मारत' घ्यावी लागते, आपली गाडी कितीही मोठी असली तरी त्यातून दळण कसे आणावे लागते वगैरे...." ....अनिल. इथे सर्वांच्या हास्याचा धबधबा! "मग आता तू कुठे राहतोस?" ....मी "मी ठाण्याला आणि मुलगा दादरला. त्याला चॉईस दिला होता. त्याच्या दृष्टीने दादर सोयीचं होतं. म्हणून तो दादरला. मला ठाण्याला राहायला काही प्रश्न नव्हता म्हणून मी ठाण्याला".... अनिल. आयुष्य दादरच्या मध्यवस्तीत काढलेल्या माणसाला ठाण्याला राहायला जाणे सोपे नव्हते. म्हणून त्याच्या सहजपणे बदल करण्याच्या मानसिकतेचे कौतुक वाटले. "सगळा नवीन set -up ना? सगळ्या व्यवस्था लागल्या?" .... मी "हो. दूध, पेपर, भाजी मार्केट सगळं छान लागलं"....अनिल "कामवाली बाई मिळाली का?" ... माझी पत्नी. तिने महिला वर्गाच्या अगदी जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. "आमच्या कडे तो काही प्रॉब्लेम नाही. तो सगळं विषय यांच्याकडे".... अदिती (अगदी खूष होत सांगत होती) "म्हणजे?" .... माझी पत्नी "अगं म्हणजे कामवाल्या बाईचा interview हे घेतात. विचार त्यांना".... अदिती "अनिल तू घेतोस interview ?".... मी "अरे it is a technique how to negotiate with her "... अनिल सांगत होता.. “म्हणजे असं बघ. मी तिला विचारतो 'तू किती पैसे घेणार दर महिन्याचे'. मग ती म्हणते '७०० रुपये'. त्यात केर - लादी, सिंक मधील छोटी भांडी घासणे आणि आठवड्यातून एकदा फर्निचर पुसणे. मग मी तिला म्हणतो 'बरं. आता मी काय सांगतो ते ऐक. 'कपड्यांच्या घड्या करून ठेवणे, खिडक्यांच्या कडा पुसणे, रोजची भाजी चिरून किंवा निवडून ठेवणे ही कामे पण करावी लागतील. या प्रत्येक कामाचे २५ रुपये याप्रमाणे एकूण ७५ रुपये मी जास्त देणार. मान्य?' ती एकदम सहज मान्य करते"..... अनिल. इथे आमचा जोरात हशा! "कमाल आहे राव तुझी" ....मी हसत हसतच म्हटले. "खरी गम्मत पुढची. ऐक. मी तिला विचारतो 'महिन्यात दांड्या किती मारणार? प्रामाणिकपणे सांग.' यावर ती थोडसं अडखळत म्हणते 'दोन होतातच साहेब. काय करनार कितीबी केलं तरी व्हतातच'. मी म्हणतो ठीक आहे. ती पण माणूस आहे. अडचणी येणारच. मग तिला मी सांगतो 'हे बघ दोन दांड्या ठीक आहेत. तिसरी दांडी झाली नाही तर त्या महिन्यात २५ रुपये अजून जास्त!" आम्ही सर्व अवाक आणि हास्याचा मोठा फवारा! "मानलं तुला. सुपर आयडिया आहे यार!" ....मी "अरे तुला माहिताय... ती दुसरीकडे दांडी मारते. पण माझ्याकडे तिसरी दांडी मारत नाही".... आम्ही हसून हसून फक्त पडायचे राहिलो होतो! "म्हणजे ती मागत होती त्याच्यापेक्षा १०० रुपये जास्तच देतोस तिला"....मी "येस. अरे पैसा वाचवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आवश्यक तिथे खर्च करायचा. मी माझ्या मुलांना सांगून ठेवलं आहे. माझ्यानंतर बँक बॅलन्स मधलं काही उरेल अशी अपेक्षा ठेऊ नका. Fixed Assets राहतील ते तुमचे! उगीच सगळं मुलांसाठी म्हणून ठेवण्यात अर्थ नाही. त्यांना सुद्धा कमवायला काय लागतं ते कळू दे".... अनिल "वा ....म्हणजे राजा - राणीचा संसारच म्हणायचं की तुझा"....मी "हो. जेवण रोज चांदीच्या ताटात. च्यायला, ती भांडी नुसती लॉकर मध्ये पडून राहतात. आपण कधी वापरायची? म्हणून मस्त राहायचं. दर आठवड्याला नवीन सिनेमा, नाटक, कार्यक्रम. आम्ही दोघंही जातो. पण आठवड्यातला गुरुवार हा स्वातंत्र्यदिन! मला जे पाहिजे ते मी करणार आणि तिला जे पाहिजे ते ती. मग मित्र, नातेवाईक, फिरणं. आपापला चॉईस. मी तिला विचारत नाही, ती मला विचारत नाही"....अनिल. आम्ही सगळे गारद! अनिलच्या या गप्पांनंतर जणू एक नवी पहाट झाल्यासारखं वाटलं. बोलता बोलता आयुष्याचं तत्त्वज्ञानच जणू त्याने सांगितलं. आपण रिटायर झाल्यावर सुद्धा किती बंधनात अडकलेले राहतो. आपण, आपल्या घरातील ज्येष्ठ, आपली मुलं, नातवंडं, आपलं घर, लग्न कार्य आणि समारंभ याच्या पलीकडे जात नाही. आपले संस्कार आणि संस्कृती त्याला कारणीभूत असू शकते किंवा व्यक्तिसापेक्ष अनेक कारणे असू शकतात. ती योग्यही असतील. पण कुठेतरी 'detached involvement ' ची स्टेज यावी असे वाटते. आपण आर्थिक दृष्ट्या पुरेसे सबळ असतानासुद्धा रिक्षा ऐवजी बस ने प्रवास करून काय साधतो? असे छोटे छोटे खर्च सुद्धा आपल्यासाठी करताना आपलाच दबाव आपल्यावर का येतो? आयुष्याच्या शेवटी आपण एक साधा सुई - दोरा सुद्धा वर नेऊ शकणार नाही हे आपल्याला माहित आहे. मग बचत करीत राहणे कशासाठी? मला वाटतं आपण थोडंसं 'आपल्या स्वतःसाठी' जगायला हरकत नाही. हा मानसिक बदल कदाचित जाणीवपूर्वक करावा लागेल. याचबरोबर, आपले आई-वडील, मुलं, आप्तेष्ट यांच्याप्रती थोडं भावनिक दृष्ट्या तटस्थ होता येण्याचा प्रयत्न करावा लागेल. यात कुणाच्याही भावनेचा अनादर करण्याचा हेतू नाही. निदान उत्तरायुष्यात तरी आपण आपल्या मनाप्रमाणे जगून आयुष्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा हाच फक्त विचार! निदान जमेल तेव्हढे तर

+7 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 7 शेयर

*एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटले.* *ते सर्वजण आपापल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत होते आणि भरपूर पैसेही कमावत होते.* *एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवले.* *प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर, प्रोफेसरानी सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारले.* *हळुहळू गप्पा रंगल्या आणि प्रत्येकांने जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करून बरेच काही सांगितले.* *शेवटी सर्वजण एका मुद्दयाशी सहमत झाले की,जरी आपण आर्थिक स्थितीने कितीही मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.* *प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत होते...* *आणि मग ते अचानक किचनमध्ये गेले आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणाले की,* *मी तुम्हा सर्वांसाठी कीटली मधे कॉफी आणली आहे तुम्ही किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी एक एक रिकामा कप घेऊन या...* *सर्वजण किचनमध्ये गेले. तिथे अनेक प्रकारचे कप होते.* *आपल्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने कप घेतले.* *प्रत्येकाने निवडलेले कप पाहून प्रोफेसर त्यांना म्हणाले की,* *"तुम्ही सर्वांनी कप निवडताना जो कप किंमतीने महाग आहे तोच चांगला आहे म्हणून निवडला असे दिसत आहे.... जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षही दिले नाही...* *साहजिकच आपण जेव्हा एकीकडे स्वतःसाठी उच्च दर्जाच्या वस्तू बाबत इच्छा मनात ठेवतो, तेव्हा दुसरीकडे हीच इच्छा बर्याचवेळी आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असतात.* *वास्तविक पाहता हे तर निश्चित आहे की, कप कोणताही घेतला असता तरी कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताही बदल होणार नाव्हता. कप तर केवळ एक माध्यम आहे की, ज्याच्या मधुन तुम्ही कॉफी पिणार आहात.* *तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती, कपाची निवडण्याची नाही.* *तरीही सर्वांनी महागातले महागच कप निवडले. आणि आपला कप निवडल्या नंतरही तुम्ही दुसऱ्‍यांच्या कपाकडेच बघत आहात.* *सर्वांनी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती , ती एकच राहिली असती! हेच सर्वात महत्त्वाचे.* *तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे.... आपली नोकरी, पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.* *म्हणून चांगल्या कॉफीची चिंता करा... भारी कपाची नाही.* *जगात सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं......* *तर......* *सुखी ते असतात जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात व जे त्यांच्याकडे आहे त्यामध्ये आनंदी रहातात...!* *म्हणून साधेपणाने जगा. सर्वांशी प्रेमाने वागा. सर्वांची काळजी घ्या. सर्वांशी नेहमी संपर्कात रहा व शक्य असल्यास प्रत्यक्ष भेटा..!!!* 😌 🙏 🙏🙏🙏🙏

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 20 शेयर

_*एक जुनी बोधकथा....*_ _एकदा एक तरुण उद्योगपतीत्याच्या नवीन आलिशान कारमधून तुफान वेगाने जात असताना अचानक त्याच्या कारच्या दरवाज्यावर एक मोठा दगड जोरात आदळला.तो भडकला,त्याने लगेच ब्रेक मारला,गाडी थांबवली आणि कार मागे घेऊन दगड जिथून आला होता तिथपर्यंत गेला.संतापाने झटकन गाडीतून उतरला.तिथे त्याला एक लहान मुलगा दिसला.रागा-रागाने तो त्याच्याकडे गेला त्याला पकडून,भिंतीवर दाबून धरले आणि विचारले;"काय रे!हे तू काय करतो आहेस?दगड मारलास माझी नवीन कार किती महागडी आहे तुला कल्पना तरी आहे का?मला आता दुरुस्तीसाठी किती पैसे लागतील माहित आहे का? "तो मुलगा ओशाळून म्हणाला;"मला माफ करा,मी काय करू?मी किती जणांना थांबण्यासाठी विनंती केली पण कोणीच थांबले नाही.काय करावे मलाच कळेना म्हणून मी तुमच्या कारवर दगड मारला."त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.त्याचे गाल ओलेचिंब झाले होते.त्याने जवळच उभ्या असलेल्या कारकडे बोट दाखवले आणि रडत रडत संगितले;"माझा मोठा भाऊ तिथे त्याच्या चाकाच्या खुर्चीतून खाली पडला आहे.त्याचे वजन जास्त आहे.मला त्याला उचलून चाकाच्या खुर्चीत बसवायला जमत नाहीये.कृपा करून मदत करा.त्याला उचलून त्याच्या चाकाच्या खुर्चीत बसवाल का?"तेव्हा त्या तरुण उद्योगपतीला भावना आवरणे कठीण झाले.तो धावतच गेला आणि त्या खाली पडलेल्या त्याच्या भावाला उचलून त्याने त्या चाकाच्या खुर्चीत ठेवले.त्याच्या खरचटलेल्या हाताला आपला रुमाल बांधला.त्या छोट्या मुलाच्या गालावरचे अश्रू पुसले.मुलाने आभार मानतांना म्हटले;"तुम्ही देवासारखे धावून आला आणि माझी मदत केलीत. देव तुमचे भले करो!तुमचा मी आभारी आहे."आपला भाऊ खुर्चीवर बसलेला पाहून त्या छोट्या मुलाचा चेहरा आनंदाने फुलला.तो मजेत खुर्ची ढकलत त्याच्या भावाला घेऊन घराकडे निघाला आणि तो अनोळखी उद्योगपतीही जड पावलांनी आपल्या गाडीकडे परतला आणि मार्गस्थ झाला.त्या उद्योगपतीच्या कारच्या दरवाज्याला आलेला मोठा पोचा लोकांचे लक्ष वेधीत होता.तरीही त्याने तो तसाच ठेवला,कधीही दुरुस्त केला नाही.केवळ या प्रसंगाने त्याने शिकलेल्या धड्याची कायम आठवण राहण्यासाठी.तो असा;"जीवनात कधीही इतक्या वेगाने धावू नकोस की तुला थांबवण्यासाठी कुणाला दगड मारून तुझे लक्ष वेधावे लागेल."या गोष्टीचा संदर्भ आजच्या युगात लावायचा तर,तो *कार चालविणारा उद्योगपती म्हणजे आपणच सारे.ती महागडी आलिशान कार म्हणजे आपले आजचे वेगवान जीवन आणि जीवन शैली.त्या चाकाच्या खुर्चीत बसलेला मुलगा म्हणजे आपले पर्यावरण आणि पृथ्वी,जिच्या शोषणामुळे होणाऱ्या जखमा सोसत असलेली.आणि तो दगड म्हणजे आजचा कोरोना विषाणू जो निसर्गाने आपले लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्यावर भिरकावलेला आहे.म्हणून भूतलावरील सर्वच प्राणिमात्रांच्या सुखमय सहजीवनासाठी संवेदनशीलता ठेवली पाहिजे.आपल्या जीवनाच्या वेगावर लक्ष ठेवायला हवे.जीवनातील आपल्या प्राधान्य क्रमांचाही विचार करायला हवा....*_ _*मिञांनो;काळजी घ्या.....*_

+6 प्रतिक्रिया 0 कॉमेंट्स • 27 शेयर